text: कुसुम पगारे "पाहुण्यांना आम्ही बोलवावं तर पाहुणे म्हणतात तुम्हालाच वापरायला पाणी नाही मग आम्ही कसे राहणार? पाहुणांच्या या प्रश्नाचं उत्तर मात्र माझ्याकडे नव्हतं," असं म्हणणं आहे मनमाड शहरातल्या रेल्वे लाईनजवळ राहणाऱ्या रेखा बनसोडे यांचं. रेखाताई गेल्या 30 वर्षांपासून मनमाडमध्ये राहात आहेत. "पाणी कधी येईल याचा नेम नाही, पण पाणीपट्टी मात्र नियमित येते. नगरपरिषदेनं आम्हाला 4 तास पाणी सोडलं तर आमच्याकडे फक्त एक ते दीड तास पाणी येतं, कारण पाण्याला पुरेसा दाब नाही आणि जलवाहिनी नादुरुस्त आहे. त्यामुळे आम्ही हे पाणी साठवून फक्त पिण्यासाठी वापरतो आणि रोजच्या वापरासाठी 100 रुपयांना 500 लीटर पाणी विकत घेतो," रेखा सांगतात. रेखा बनसोडे मनमाडच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 70 वर्षीय कुसुम पगारे यांच्या घरी लग्नाचे पाहुणे आले होते. त्यांना महिन्याला दोन हजार रुपये पगार आहे. त्यांना न पाणी विकत घेणंही परवडणारं नाही. सकाळच्या वेळी त्या धुणी- भांड्यांची कामं करतात. विधवा मुलगी आणि चार नातवंडं असा त्यांचा परिवार आहे. त्यांची मुलगीही घरकाम करते. 'अंघोळ नाही केली तर मालक कामावर घेणार नाही' हातावर पोट असणाऱ्या कुसुमबाई सांगतात, "एकवेळ प्यायला पाणी नसेल तर चालेल पण आंघोळ करावीच लागते. नाहीतर आमचे मालक लोक आम्हाला कामावर येऊ देणार नाहीत. पोटाला चिमटा बसला तरी चालेल पण कामावर आंघोळीसाठी पाणी हवंच. स्वच्छ कापडं घालून गेलं पाहिजे. नाहीतर चांगल्या ठिकाणी काम मिळणार नाही." या ठिकाणी गेली 25 वर्षं राहतोय. पण कमी अधिक प्रमाणात पाण्याचा खेळ हा असाच आहे, त्या सांगतात. "त्यात अधूनमधून जलवाहिनी खराब असते. तीही दुरुस्त करावी लागते", कुसुमबाई सांगतात. 'किराणा मिळेल पण पाणी उधार मिळत नाही' "कधी कधी पैशाची टंचाई आली तर पैसे उधार घेतो, एक वेळ किराणा उधार घेत असतो पण पाणी उधार नाही मिळत. मग आर्थिक अडचणीच्या वेळी याची टोपी त्याला आणि त्याची याला असा कुटुंबाचा गाडा चालवावा लागतो. आम्ही सांगून सांगून थकलो. खूप मोठी लोकं भांडली त्यांच्याकडून काही झालं नाही. आम्हा गरिबांना तर ही लोक पायाने सारतील. काही अपेक्षा नाही कुणाकडून, देवाला डोळे आहेत तोच या गरिबाला पाणी देईन आणि पोटाला बसणारा चिमटा सैल होईल," कुसुमबाई सांगतात. मनमाड शहरातलं चित्र हे असं आहे. 'यंदाची परिस्थिती बरी' "पिण्यासाठी पाणी नगरपरिषदेचं आणि वापरण्यासाठी मात्र बोअरवेल अथवा टँकरचं. ज्यांच्या घरी बोअरवेल आहे त्यांच्यासाठी आताची परिस्थिती थोडी सुसह्य आहे. कारण मागच्या 3 ते 5 वर्षांत मार्च -एप्रिलमध्ये बोअरवेलचं पाणीही आटायचं आणि टँकरमागे पळावं लागायचं," अशी माहिती सरकारी कर्मचारी राजेश जाधव देतात. पण इथली सत्तर टक्के जनता अशी आहे ज्यांच्याकडे बोअरवेल नाही. ज्यांचं हातावर पोट आहे त्यांची अवस्था याहूनही वाईट आहे. 'आमच्या घरी एक तारखेपासून पाणी आलेलं नाही' आनंदवाडी इथल्या एका वस्तीला आम्ही भेट दिली. शेती अथवा मजुरी करणाऱ्या कष्टकरी कामगारांची अंदाजे 4000 लोकसंख्या असलेली ही वस्ती. वस्तीत प्रवेश करतानाच आम्हाला पाण्यात औषध टाकणाऱ्या सुवर्णा गरुड भेटल्या. चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं, "1 तारखेला पाणी आलं होतं. आज 13 तारीख आहे पाणी नाही. कधी येणार माहिती नाही. पाणी मुळातच शुद्ध येत नाही, गढूळ पाणी येतं. त्यात साठवणूक केल्यामुळे ते खराब होतं म्हणून आम्ही औषध टाकून पाणी पितो." भोसलेबाई मुलगा विजय सोबत. याच भागात भाबडवस्ती आहे. येथील नागरिक श्रीमती भोसले सांगतात, "आमची घरं टेकडीवर आहेत. इथली पाईपलाईन खूप जुनी असून गटारीला समांतर आहे. ती गळते आणि त्यामुळे आम्हाला दूषित पाणीपुरवठा होतो.... आणि तोही अगदी काही मिनिटं. शहराच्या काही भागात दिवसाला 4 ते 5 तास पाणी येत असले तर आम्हाला केवळ 1 ते दीड तास तेही अगदी कमी दाबाने पाणी मिळतं. आमच्या घरी तर गेल्या एक तारखेपासून पाणी आलेलं नाही कारण वरती चढेल एवढा पाण्याचा दाब नव्हता. इथे नगरपरिषदेनं काही वर्षांपूर्वी हातपंप बसवले पण त्याला पाणीच नाही." त्यांचे पती सुरेश आणि मुलगा विजय रेल्वे स्टेशनवर दोनशे ते तीनशे रुपये रोजाने मिळेल तसं काम करतात. घरात एकूण सहा माणसं आहेत. त्यामुळे दिवसाला किंवा दिवसाआड 2 टाक्या म्हणजेच एक हजार लीटर पाणी दोनशे रुपयांत खासगी टँकरकडून विकत घ्यावं लागतं. महिन्याला दोघेही सुट्ट्या वगळता जास्तीत जास्त 14000 ते 18000 कमावतात. यातला महिना पाच ते सहा हजार रुपये पाण्यावर खर्च होतो. "सांगा कसं जगायचं? आम्ही तक्रारी करून थकलो. आता कुणाला काही तक्रार नाही करत आम्ही. सर्वांना सर्व समजतं पण करत कुणीच काही नाही. बस एकच इच्छा आहे की आम्हाला 3 ते 4 दिवसांनी पूर्ण दाबाने पाणी पुरवठा व्हावा," भोसलेबाई सांगतात. व्यावसायिकही याच परिस्थितीत छोट्या व्यावसायिकांची परिस्थितीही काही वेगळी नाही. रेल्वे पुलाजवळ उसाची रसवंती चालवणारे राजू पठाण यांनी रसवंतीच्या ठिकाणी बोर्डवर स्पष्ट लिहिलं आहे की, पाणी फक्त पिण्यासाठीच वापरा. तेही पाणी विकत घेतात. 150 रुपयांत 500 लीटर पाणी घ्यावं लागतं, असं सांगतात. राजू पठाण "एवढ्या उन्हात गिऱ्हाकाईला प्यायला पाणी द्यावंच लागते. इतर ठिकाणी बोअरिंगचं पाणी वापरतात. पण स्पर्धेमुळे आम्हाला 10 रुपये ग्लासनेच रस विकावा लागतो. पाणीही द्यावंच लागतं. अशा वेळी पाणी वाचवण्यासाठी लोकांना आम्ही पाणी जपून वापरण्यास सांगतो. याचा परिणाम आमच्या नफ्यावर होतोय पण दुसरं काय करणार?" राजू पठाण सांगतात. मनमाडमध्ये प्रत्येकाच्या घराबाहेर पाण्याच्या टाक्या दिसतात. खासगी टँकरवाल्यांना फोन केला की ते येतात आणि पाणी देतात. काही टँकर हे शेतकऱ्यांचे आहेत, ते ओळखीच्या ठिकाणी पाणी देतात. जवळच असलेल्या नागपूर येथील विहिरीतून पाणी भरून ते वाटप करतात. नियमित पाणी देणाऱ्या नागपूर येथील अनिल दराडे यांना भेटलो. ते नुकतेच टँकर घेऊन पाणी देत होते. अनिल दराडे "आम्ही शेतकऱ्याला एका टँकर भरण्यासाठीचे 300 रुपये देतो. साधारण 400 रुपयांचे डिझेल ट्रॅक्टरला लागते. आमच्या हातात दिवसाला साधारणपणे 300 रुपये उरतात. जर व्यवहारिकदृष्ट्या बघितले तर 300 रुपये हातात येतात. पण पाईप, टँकर आणि ट्रॅक्टरचा मेंटेनन्स बघता ना नफा ना तोटा असाच व्यवहार आहे," दराडे सांगतात. बेरोजगारांसाठी पाणी विक्रीचा व्यवसाय येथील काही बेरोजगार तरुणांनी छोटे टेम्पो घेऊन पाणी भरून देण्याचा व्यवसाय स्वीकारला आहे. "वर्षभर पाणी पुरवावं लागत असल्याने त्यांना नियमित काम मिळतं. ते रेल्वेच्या बोअरवेल मधून अनधिकृतरीत्या पाणी उचलतात. यामुळे रेल्वे प्रशासन आणि स्थानिक यांच्यात अनेकदा संघर्ष झाला आहे. पण पाणी प्रश्न असल्याने शेवटी स्थानिक लोकप्रतिनिधींमुळे संघर्ष सामोपचाराने मिटवला जातो. शिवाय रिकामटेकडे उद्योग करण्यापेक्षा मुलं काम करतात हे महत्त्वाचं," अशी माहिती गावचे रहिवासी लियाकत अली शेख देतात. अरुण धीवर लियाकत यांचे नातेवाईक टँकरनं पाणीपुरवठा करतात. यावर मात्र बाकी टँकर चालकांनी बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला. व्यवसायाने वायरमन असलेले अरुण धीवर म्हणतात की, "आम्ही घरातलं शौचालय वापरत नाही. कारण देखभालीसाठी आणि वापरासाठी खूप पाणी लागते. त्यामुळे इच्छा नसताना आम्हाला उघड्यावर शौचास जावं लागतं. शेवटी पाणी कमी लागते. पंतप्रधान लाख म्हणतात 'स्वच्छ भारत ..सुंदर भारत' पण जमिनीवरची ही सत्य परिस्थिती त्यांनी बघायला हवी. गेल्या दहा वर्षात आमच्याकडे कधी दिवसा नळाला पाणी आले, मला आठवत नाही. पाणी नेहमीच रात्री 11 नंतर कधीही येतं आणि त्यात ते किती वाजता येईल याचा नेम नाही." प्रशासनं काय म्हणतं? या सर्वांचं पालकत्व असणाऱ्या मनमाड नगर परिषदेची अवस्था मात्र वेगळी आहे. 26 कोटी रुपये बजेट असणारी मनमाड नगर परिषद 2 कोटी रुपये पाणी पुरवठ्यावर खर्च करते. त्यांना वर्षाला 96 लाख रुपये पाणीपट्टी वसुली अपेक्षित आहे पण वसूल होतात केवळ 20 ते 25 टक्केच. यावर्षी केवळ 21 % वसुली झाली आहे. "लोक पाणी मिळत नाही म्हणून पाणीपट्टी भरण्यास नकार देतात. शहराची पाणीपुरवठा योजना 40 वर्षं जुनी आहे आणि तीही तेव्हाच्या 35 हजार लोकसंख्येच्या हिशोबाने तयार केलेली आहे. आता शहराची लोकसंख्या लाखाच्या वर आहे. म्हणून आम्ही यावर्षी शहराचे वेगवेगळे झोन करून त्या-त्या झोनला पाणीपुरवठा करत आहोत," अशी माहिती नगरपरिषदेचे अध्यक्ष गणेश धात्रक देतात. वागदर्डी धरण "आमच्या शहराला वागदर्डी धरणातून पाणीपुरवठा होतो. हे धरण पावसाच्या पाण्याने 30% भरलं होतं. पण पालखेड धरणातून पिण्याचं पाणी आरक्षित करून ते आम्ही पाटोदा येथील साठवण तलावात आणतो. तेथून पंपिंग करून वागदर्डी धरणात आणलं जातं. परंतु पालखेड ते पाटोदा तलाव यादरम्यान पाणी कॅनॉलद्वारे येतं. यामध्ये प्रचंड वहन हानी आहे. म्हणजे वाहून आणतानाच भरपूर पाणी वाया जातं. 500 दशलक्ष घनफूट पाणी जरी आरक्षित असलं तरी आमच्यापर्यंत केवळ 100 दशलक्ष घनफूट पाणी येतं आणि तेवढंच पाणी नियोजनपूर्वक वापरलं जाते," धात्रक पुढे सांगतात. "काही ठिकाणी पाणी पोहोचत नाही हे मान्य आहे. शहराची पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जुनी असून नवीन जलवाहिनी टाकणे गरजेचे आहे. आमच्याकडे दोन योजना आहेत. आम्ही त्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवल्या आहेत. ही 12.52 कोटीची योजना असून त्यामुळे खूप फरक पडेल. तसेच शार्दुल नगर बेंद्रे चाळ येथे एक जलकुंभ नवीन बांधत असून त्यामुळे आनंदवाडी, शाकुंतल नगर, रेल्वे लाईन आदी ठिकाणी मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होईल. तर संपूर्ण शहरासाठी दरडोई 135 लीटर अशा स्वरुपाची हायड्रोलिक तंत्राने चालणारी पाणीपुरवठा योजना आम्ही तयार केली असून त्यासाठी तांत्रिक मंजुरी अहवालासाठी नगरपरिषदेने 60 लाख रुपये मंजूर केले आहेत. पण ही दीर्घकालीन योजना आहे. शासनस्तरावर वेळेत कार्यवाही झाली तर लवकरच शहराची पाणीपुरवठा योजना अद्यायवत होईल," असं मत धात्रक व्यक्त करतात. हे वाचलंत का? (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.) एक लाख लोकवस्तीच्या मनमाड शहराला तब्बल 13 दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. या कारणामुळे येथील रहिवाशांकडे पाहुणे येतच नाहीत.